Friday, 27 October 2017

"संपूर्ण राज्यात 'व्हीव्हीपॅट' यंत्रांचा वापर करणारे गुजरात हे पहिले मोठे राज्य"

निवडणुकीत  आता  व्हीव्हीपॅटचा वापर ..... मतदारांना मिळणार पोचपावती... मतदान प्रक्रियेबाबत विश्वास निर्माण होणार
"संपूर्ण राज्यात 'व्हीव्हीपॅट' यंत्रांचा वापर करणारे गुजरात हे पहिले मोठे राज्य"

मतदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान केलं, आणि खरोखरच ते त्यालाच ते मिळालं की नाही, हि माहिती आतापर्यंत समजत नव्हती. मात्र आता यापुढे तुम्ही केलेलं मतदान, त्याच उमेदवाराला मिळालं आहे की नाही, हे समजणार आहे.
८  ऑक्टोबर २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवणूक आयोगाला ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रणा वापरण्यासाठीची परवानगी दिली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही देशभरातील अनेक  निवडणुकीत ही यंत्रणा वापरली जात नव्हती 
काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिन्समध्ये फेरफार केल्याचे आरोप विरोधी पक्षांनी केले होते. त्यावरून देशभरात एकच गदारोळ माजला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने मात्र अशा प्रकारे ईव्हीएम मशिन्समध्ये फेरफार करताच येत नाही, असे वारंवार निक्षूण सांगितले होते. त्याचबरोबर ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून दाखवा, असे खुले आव्हान दिले होते. त्यानंतरही या यंत्रांबद्दल संशयाचे वातावरण कायम होते . त्यातूनच ईव्हीएम मशीनला व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यंत्रणा जोडण्याची मागणी पुढे आली होती 
‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांच्या खरेदीसाठी निवडणूक आयोगाने जून 2014 पासून सातत्याने मागणी केली आहे. त्यासाठी आयोगाने केंद्र सरकारला आतापर्यंत 11 स्मरणपत्रे पाठवली होती. 
 सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाला ‘व्हीव्हीपॅट’ खरेदीसाठी कालमर्यादा निश्‍चित करण्यास सांगितले होते. 
त्याचा परिणाम म्हणून आता देशभरात सर्वीकडे  व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल अर्थात व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करण्यात येणार आहे.


व्हीव्हीपॅट अर्थात व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल मशिन कसे आहे 
मतदार जेव्हा एखाद्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी त्याच्या चिन्हापुढील बटण दाबतो, तेव्हा  ज्या उमेदवारच्या नावापुढील बटण दाबले गेले, त्याचे नाव आणि चिन्हाची प्रिंट निघते. मतदाराला व्हीव्हीपॅट मशिनवरील स्क्रीनवर काही सेकंद ही प्रिंट स्पष्ट दिसते आणि मग ही प्रिंट व्हीव्हीपॅट मशिनमधील डब्यात जाऊन पडते.
अशा पद्धतीने मतदारला मतदान कुणाला केले आणि ते खरोखर कुणाला झाले याची खात्री मिळणार आहे . इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसोबत ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांचा वापर झाल्यास मतदानाबाबत निर्माण होणारा संशय दूर होणार आहे. यामुळे  मतदारसंघातील मतदारांना आपण दिलेले मत इव्हीएम मशीनमध्ये योग्य प्रकारे नोंदवले गेले की नाही याची माहिती मिळेल.
मतदाराने बनावट तक्रार  केल्यास होणार शिक्षा :
व्हीव्हीपॅट' यंत्रामुळे मतदारांना त्यांचे मत योग्य प्रकारे नोंद झाले आहे अथवा नाही, याची खात्री करता येणार आहे; तसेच शंका आल्यास तक्रारही करता येणार आहे.
मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यावर असेल . 
तसेच मतदाराने  बनावट तक्रार केल्याचे सिद्ध झाल्यास  संबंधित निवडणूक अधिकारी त्या मतदाराविरोधात तक्रारही करू शकतो.आणि अशावेळी  संबंधित मतदाराला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते
व्हीव्हीपॅट’ यंत्रांच्या निर्मात्या कंपन्या : 
व्हीव्हीपॅट’ यंत्रांची निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून  करण्यात येते. याच दोन कंपन्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचीही निर्मिती करतात. 
'ईव्हीएम'मध्ये त्रुटी? 
'ईव्हीएम'द्वारे मतदान केल्यानंतर, 'आपले मत नेमके संबंधित उमेदवाराला गेले का', 'बीप वाजल्यानंतर नेमका कोणता लाइट लागला होता', 'माझे मत वाया तर गेले नाही ना'... असे अनेक प्रश्न मतदारांना पडतात. यामुळे अनेकवेळा 'ईव्हीएम'मध्ये त्रुटी आहेत, अशा तक्रारी अनेकवेळा मतदार करत असतात. परंतु  'ईव्हीएम'सोबतच व्हीव्हीपॅट मशिन वापरले तर  मतदारांना पडणाऱ्या प्रश्नांचे अवघ्या सात सेंकदात समाधान होईल .
संपूर्ण राज्यात 'व्हीव्हीपॅट' यंत्रांचा वापर करणारे गुजरात हे पहिले मोठे राज्य ठरणार आहे ::
गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रांवर 'व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल' (व्हीव्हीपॅट) यंत्राचा वापर केला जाणार आहे. 
देशातील सर्व निवडणुकांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांबरोबरच 'व्हीव्हीपॅट' यंत्रांचा वापर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार संपूर्ण राज्यात 'व्हीव्हीपॅट' यंत्रांचा वापर करणारे गुजरात हे पहिले मोठे राज्य ठरणार आहे . 
संपूर्ण देशभरात अशी पद्धत लागू करण्यासाठी आवश्यक तेवढी व्हीव्हीपॅट मशिन्स तातडीने उपलब्ध होणे शक्य नव्हते . त्यामुळे निवडणूक आयोगाने अद्यापि ही पद्धत देशभरातील निवडणुकांसाठी स्वीकारलेली नव्हती . या पार्श्वभूमीवर गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्याचे आदेश आयोगाला द्यावेत, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे एका याचिकाकत्र्याने केली होती. त्या याचिकेवरील सुनावणी प्रसंगी आयोगाने शपथपत्रावर ही हमी दिली होती  . त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर होणार, हे  निश्चित झाले होते ..

मतदान प्रक्रियेबाबत एक विश्वास निर्माण होणार : 
- व्हीव्हीपॅट मशिनवर प्रत्यक्ष कोणाला मतदान केले याची माहिती असल्याने मतदान प्रक्रियेबाबत एक विश्वास निर्माण झाला आहे.
- मतदारांना अवघ्या सात सेकंदांत आपण कोणाला मतदान केले हे समजणार आहे.

लेखक :  प्रा योगेश  हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(handgeyogesh@gmail.com)

No comments:

Post a Comment