Tuesday, 3 October 2017

निअर फील्ड कम्युनिकेशन (एनएफसी) तंत्रज्ञान

निअर फील्ड कम्युनिकेशन (एनएफसी) तंत्रज्ञान ......"मोबाइल वाॅलेट"


काही बँकांनी त्यांची पेमेंट अॅप्स बाजारात आणली आहेत, तसेच काही दूरसंचार व इतर कंपन्यांनीही अशी अॅप्स आणली आहेत. त्याच्या मदतीनं मोबाइलच्या माध्यमातून बिल भरण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहे. थोडक्यात, हे मोबाइल वॉलेट ग्राहक व विक्रेत्यांमधील दुवा आहे. मोबाइल वॉलेट म्हणजे वर्चुअल पाकीटच म्हणा ना. ऑक्सिजन वॉलेट, पेटीएम, सायट्रस पे, पेयुमनी, चिल्लर, फ्रीचार्ज, मोबीक्विक, एमपेसा ही व इतर अॅप्स म्हणजे मोबाइल वॉलेट.
रिक्षा व टॅक्सी भाडे, हॉटेलची बिले इ. भरण्याचे काम मोबाइलमधून होत आहे. क्रेडिट कार्डचे धोके वाढलेले आहेत, त्यामुळे अनेक ग्राहक आज मोबाइल वॉलेट्सकडे वळलेले आहेत. वापरकर्त्यांना विविध ऑफर्सही मिळत आहेत.

निअर फील्ड कम्युनिकेशन (एनएफसी)
स्मार्टफोनच्या एनएफसी म्हणजेच निअर फील्ड कम्युनिकेशन तंत्रज्ञानाद्वारे स्मार्टफोनचं रूपांतरच मोबाइल वॉलेटमध्ये होतं. या डिजिटल वॉलेटसाठी स्मार्टफोनमध्ये एनएफसी हे फीचर असायला हवं. एनएफसी तंत्रज्ञानामध्ये ठरावीक अंतरावरून एनएफसी असलेला मोबाइल फिरवून क्रेडिट/डेबिट कार्डसारखेच पेमेंट भरता येते. ज्याप्रमाणे बिल पेड करते वेळी क्रेडिट/डेबिट कार्ड त्या मशीनमध्ये स्वॅप करून नंतर पिन टाकून पेमेंट करता येते, त्याचप्रमाणे मोबाइल वॉलेट तंत्रज्ञानात एनएफसीचा वापर करून पेमेंट केलं जातं. यामध्ये मोबाइल स्वॅप करण्यासाठी एक वेगळं मशीन वापरलं जातं. त्यात निअर फिल्ड कम्युनिकेशन हे फिचर असलेला मोबाइल रीड होतो. एका ठरावीक अंतरावरून मोबाइल स्वॅप मशीनवरून फिरवून सिक्युरिटी पासवर्ड टाकल्यानंतर मशीन मोबाइलमधील क्रेडिट/डेबिट कार्ड वाचून त्यातून पैसे कापून व्यवहार पूर्ण करते. अनेक बॅँकांनी एनएफसीचा वापर करून मोबाइल वॉलेट किंवा डिजिटल वॉलेटची सुविधा सुरू केली आहे.

एनएफसी तंत्रज्ञानाचे फायदे
मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून बारकोड आणि क्यूआर कोड तंत्रज्ञान वापरून बिलं भरली जातात. या अनोख्या पद्धतीमुळे व्यवहारात सुरक्षितता मिळते. कारण याचा वापर करताना कुठल्याच कार्डाची अथवा बँक खात्याची माहिती द्यावी लागत नाही. ग्राहक आणि उद्योजक यांना वैयक्तिक क्यूआर कोड दिला जातो, याद्वारे व्यवहार सेक्युअर होतो.
- आॅफलाइन आणि आॅनलाइन अशा दोन्ही पद्धतीने याचा वापर करण्याची सुविधा यात उपलब्ध आहे.
- मोबाइल वॉलेटचा सर्वात चांगला फायदा म्हणजे, व्यवहाराची सुरक्षितता. एनएफसीचा मोबाइल हरविला किंवा चोरीला गेला तरी अधिक कडक सिक्युरिटी फीचर्समुळे त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नसते.
- एचडीएफसीने पेजॅप आणि आयसीआयसीआयने पॉकेट नावाने आपले मोबाइल वॉलेट लाँच केले आहे.
मोबाइल वॉलेट अॅप्स
भारतीय स्टेट बँकेने एसबीआय बडी हे मोबाइल वॉलेट अॅप लाँच केले आहे. एसबीआयचे मोबाइल वॉलेट फक्त एसबीआयच्या ग्राहकांसाठी नसून इतर सर्व बँकेच्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. स्टेट बँकेने हे वॉलेट फक्त अँड्रॉईड यूजर्ससाठी ठेवले आहे. अॅक्सेंचर आणि मास्टर कार्ड यांच्या सहकार्याने, ‘बडी मोबाइल वॉलेट’ तयार केले आहे. हे अॅप १३ भाषांत उपलब्ध असून कोणतेही कार्ड वापरणाऱ्या ग्राहकाला कोणत्याही बँकेशी व्यवहार करण्यासाठी ते वापरता येईल.
लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

No comments:

Post a Comment