विविध सेवांचे मोबाईल ॲप
सध्या विविध शासकीय सेवांचे आणि खाजगी सेवांचे विविध मोबाईल अॅप्स
शासनाच्या विविध विभागांनी तसेच खाजगी समूहाने विकसित केलेले आहे
विविध कॅटॅगिरीधील सर्वात जास्त उपयोगी मोबाईल अॅप्सचा उहापोह करू या !
महावितरणचे मोबाईल ॲप
महावितरणचे दर महिन्याच्या वीजबिलावरील क्यूआर कोडच्या साह्याने अवघ्या एका क्लिकवरून महावितरणचे ॲप डाऊनलोड करण्याची सोय महावितरणने केली आहे.
हे ॲप ॲन्ड्रॉईड, विन्डोज आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या मोबाईल ग्राहकांना क्यूआर कोडच्या साह्यानेडाऊनलोड करणे शक्य होणार आहे,
नव्या स्वरूपातील वीजबिल ग्राहकांना वितरित करण्यात येत असून सद्यस्थितीत बारकोडपेक्षाही अधिक वापर असलेल्या क्यूआर कोड या वीजबिलावर आहे. याद्वारे महावितरणचे मोबाईल ॲप थेट डाऊनलोड करता येत आहे. मोबाईलधारकांनी स्मार्टफोनमध्ये असलेल्या किंवा डाऊनलोड करून घेतलेल्या क्यूआर कोड रीडरच्या माध्यमातून महावितरणच्या वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅन केला की थेट महावितरण मोबाईल ॲपची लिंक मिळत आहे.
उपलब्ध सुविधा :या ॲपमधून उच्च व लघुदाब (एलटी व एचटी) नवीन वीजजोडणीची मागणी करता येणे शक्य झाले आहे. चालू व मागील बिल पाहणे आणि त्याचा भरणा करण्यासाठी नेटबॅंकिंग, क्रेडिट / डेबिट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्डसचा पर्याय आहे; तर भरलेल्या पावतीचा तपशीलही देण्यात येत आहे. ॲपमधील टोल फ्री क्रमांकावरून कॉल सेंटरमध्ये संपर्काची व तक्रारी नोंदवण्याची सोय आहे,
महावितरणने विविध ग्राहक सेवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्याने त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यात १२ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी महावितरण मोबाईल ॲप डाऊनलोड केले आहे.
अत्यावश्यक वैद्यकीय सेवेच्या मोबाईल ॲप
गोल्डन अवर सिस्टीम्स या कंपनीने बनविलेले ‘Ambulance.run’ हे आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संबधित ॲप आहे.
या ॲपद्वारे वापरकर्ता आपत्कालीन स्थितीमध्ये स्मार्ट फोनच्या मदतीने ॲम्ब्युलन्स बुक करू शकतात. काही क्लिकद्वारे आपल्या जवळील ॲम्ब्युलन्स शोधण्यासाठी, बुक करण्यासाठी आणि सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी हे ॲप वापरकर्त्याला उपयोगी पडेल .
या ॲपद्वारे वापरकर्त्याची सद्यस्थिती हेच त्याचे आपत्कालीन किंवा पिक अप लोकेशन गृहीत धरली जाईल . हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात सहाय्यक ठरेल . ‘Ambulance.run’ सद्यस्थितीला २५०हून अधिक रूग्णवाहिका ऑपरेटर त्याचबरोबर ३६० हून अधिक ॲम्ब्युलन्सबरोबर कार्यन्वित आहे.
हे ॲप Google plystore वर उपलब्ध आहे. आणि आपण www.ambulance.run हया संकेतस्थळावर ॲम्ब्युलन्स बुक करु शकता.
पर्यटन स्थळांच्या माहितीचे टूरीझम मोबाईल ॲप(एम.टी.डी.सी.मोबाईल ॲप)
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून टूरीझम मोबाईल ॲप ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे राज्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होते
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मोबाईल ॲपमध्ये पर्यटकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना सबंधीत पर्यटन स्थळाजवळील हॉटेल्स, रिसॉर्ट, हॉलीडे पॅकेजची माहिती, निसर्गरम्य स्थळे, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती, ई गाईडची सुविधा, तसेच नकाशा पाहून पर्यटनाच्या दृष्टीने नियोजन करता येणे सोपे होणार आहे.
पोस्टमन मोबाईल ॲप
टपाल विभागाच्या वतीने “पोस्टमॅन मोबाईल ॲप” सुरु करण्यात आले आहे या द्वारे स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्र, टपाल आदींच्या वितरणाची योग्य वेळेवर खातरजमा करुन घेता येते . टपाल विभागात कार्यरत असणाऱ्या काही पोस्टमनना स्मार्ट फोन देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये पोस्टमॅन ॲप चा समावेश करण्यात आलेला आहे. टपाल वस्तू प्राप्त करणे, ई-हस्तांक्षर घेणे, त्याच ठिकाणी सेंट्रल सर्व्हर मध्ये संबंधित माहिती अपलोड करणे आदी या ॲप्लिकेशनची वैशिष्ट्ये आहेत
लेखक : प्रा योगेश हांडगे
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )
No comments:
Post a Comment